Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक धक्के बसताना पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अलीकडेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात येऊ शकतात, असा दावा नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर आता एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर थेट शब्दांत भाष्य केले आहे. मी राजीनामा दिल्यानंतरचे ते पत्रक उद्धव ठाकरेंना पाठवले होते. त्यावर त्यांनी नमस्कार आणि स्मायली पाठवून प्रतिक्रिया दिली. मी सोडून जाणार आहे याची त्यांना आधीच कुणकुण लागली होती असे मला वाटते, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरे यांनी दिला नाही, अशी तक्रारही नीलम गोऱ्हे यांनी केली.
रश्मी वहिनी राजकारणात येऊ शकतात
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, रश्मी वहिनी गृहिणी आहेत. त्यांची भूमिका ही उद्धव ठाकरेंना पूरक असते. त्या उत्साही आणि क्रियाशील आहेत. त्या राजकारणात आल्या तर येऊ शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आजारी पडल्यानंतर आमची चर्चेची दार बंद झाली. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, संजय राऊतांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या आमदारकीच्या वेळेस अनेकदा मदत केली. पण सध्याच्या राजकारणामुळे त्यांचा बळी गेला. खूप त्रास सहन करावा लागला. संजय राऊत यांनी टोकाचे बोलू नये, वैचारिक मांडणी करावी असे मला वाटते. पण काही लोक आक्रमक बोलू आणि लिहू शकत नाहीत, ते संजय राऊतांना हे करायला सांगतात पण त्यामुळे संजय राऊतांना त्रास सहन करावा लागतो, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.