Shiv Sena Shinde Group News: एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात खूप मोठा फरक आहे. राज ठाकरे हे नेहमी स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो. त्यांना सल्ला देणार नाही, तसा प्रयत्न केला तर ते चुकीचे ठरेल. माझे त्यांना एवढेच म्हणणे आहे की, त्यांनी चांगल्या कामाला चांगले म्हटले पाहिजे. निवडणुका आल्यावर प्रत्येक गोष्टीवर टीका केलीच पाहिजे असे नाही. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. देशात त्यांची तशीच प्रतिमा आहे. ती प्रतिमा त्यांनी तशीच राहू द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुंबईतील पाच टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोलमाफीचा निर्णय जाहीर केला. यावर प्रतिक्रिया देताना, गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता. त्या लढ्याला यश आले. उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. यावर बोलताना, हा निर्णय उशिरा घेतला गेला नाही. उलट राज ठाकरे यांनी या निर्णयाचे कौतुक करायला हवे, असे रामदास कदम म्हणाले.
या सरकारने सर्वाधिक व लोकाभूमिक निर्णय घेतले आहेत
महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. मात्र, या सरकारने सर्वाधिक व लोकाभूमिक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. यांच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत २५० हून अधिक लोकाभिमूक निर्णय घेतले आहेत, असे रामदास कदम यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, मुंबईच्या सीमेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे टोलमधून सूट मिळावी. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा टोलमाफीसाठी आंदोलन करुन कोर्टात गेलो होतो. मला आनंद आहे की लाखो लोकांना या टोल माफीमधून दिलासा मिळणार आहे. हलकी वाहने आपण टोलमधून वगळली आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. या सगळ्याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे. मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना देखील आम्ही केली आहे. ही अनेक वर्षांपासून मागणी होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.