Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच ठिकाणी, त्याच मैदानात सभा घेतली. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक यादी शेअर करत उद्धव ठाकरे गट आयारामांच्या भरवश्यावर असल्याचा खोचक टोला लगावला आहे.
शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आलाय आणि सध्या त्यांच्याकडे काय जबाबादारी आहे याची माहितीच शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच ही यादी देतानाच खोचक कमेंटही केली आहे.
ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलेय?
सचिन अहिर-राष्ट्रवादी, सुषमा अंधारे–राष्ट्रवादी, भास्कर जाधव – राष्ट्रवादी, वैभव नाईक – काँग्रेस, मनिषा कायंदे – भाजप, प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेस, संजना घाडी – मनसे, राहुल कानाल – काँग्रेस, साईनाथ दुर्गे – मनसे अशी काही नावांची यादी दिली आहे. ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलेय? असा सवालही केला आहे.
दरम्यान, खेड येथील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संबोधित करताना खोके आणि गद्दारी करून नव्हे तर खुद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवून आणल्याचे एकनाथ शिंदे ठणकावून सांगितले. सगळीकडे तीच टेप आणि फक्त दोन मुद्यांवर टीका हेच रडगाणे आता राज्यभर ऐकायला मिळणार असल्याचा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"