“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:13 PM2023-12-13T23:13:26+5:302023-12-13T23:15:20+5:30
Shinde Group Vs NCP Sharad Pawar Group: तुमच्या घरात काय सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.
Shinde Group Vs NCP Sharad Pawar Group: सध्या राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, हिवाळी अधिवेशन आणि आमदार अपात्रता प्रकरण अशा अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे ग्रुप आणि ठाकरे ग्रुप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ग्रुप आणि शरद पवार ग्रुप एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. यातच आता शिंदे गटाने शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली. यावरूनही दावे-प्रतिदावे करण्यात आले. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही रोहित पवार सातत्याने सातत्याने टीका करतात. यावरून आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मीडियाशी बोलताना मनिषा कायंदे म्हणाल्या की, सरकार कधी पडणार, कधी पडणार याच्या नवनवीन तारखा सातत्याने दिल्या जात आहेत. हेच आता रोहित पवारही करू लागले आहेत. रोहित पवार यांना मला विचारायचे आहे की, पवार नाव बाजूला केले तर तुमचे स्वतःचे काय कर्तृत्व आहे. तुमच्या घरात काय चालले आहे, हे तुम्हालाच माहिती नाही. तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात. याच भ्रमित अवस्थेत यात्रा काढली. या यात्रेत तुम्ही युवकांचे प्रश्न काहीतरी घेत होतात. परंतु, तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात. सभागृहात तुम्हाला पाठवले आहे. युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला हवी, अशी विचारणा मनिषा कायंदे यांनी केली.
रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत
म्हणजे राहुल गांधी तुम्ही बनताय की काय, अशी शंका आता लोकांना येऊ लागली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी आमच्याविषयी तसेच आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहोत, यावर स्वतःचा वेळ खर्ची करू नये. याउलट तुमच्या घरात काय सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका, अशी खोचक टीका मनिषा कायंदे यांनी केली.
दरम्यान, शिंदे गटाच्या काही खासदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपसाठी सध्या देशभरात अनुकूल स्थिती असल्याचे सांगत शिंदे गटाच्या काही खासदारांनी अशी भूमिका मांडल्याचे बोलले जात आहे. मात्र खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतच्या चर्चा फेटाळून लावत, शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असे ठामपणे सांगितले आहे.