Deepak Kesarkar On Manoj Jarange Agitation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या पुढील आंदोलनाबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, एक गोष्ट अशी आहे की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही तांत्रिक प्रक्रिया असते, ती पूर्ण करावीच लागते. त्यामुळे त्यांची सगेसोयरे यांच्यासंदर्भातील जी मागणी होती, त्या नोटिफिकेशन सरकार सकारात्मक आहे. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितली आहे. अशामुळे लोकांची एक सहानुभूती जी मराठा समाजाला मिळत आहे, ती कमी होत आहे, याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आनंदाने पुढील कारवाई करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी त्यांनी तो वेळ दिला पाहिजे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे.
कोकणाचा मान-सन्मान या निवडणुकीत दाखवून देऊ
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. मात्र, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका करत त्यांचा १०१ टक्के पराभव करू, असा दावा केला आहे, यावर दीपक केसरकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, मूळात विनायक राऊत पुन्हा निवडून आले नसते. या जिल्ह्यात मी आणि नारायण राणे आम्ही दोघे राहतो. विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यात माझीसुद्धा मोठी भूमिका राहिली आहे. नारायण राणे यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे संघर्ष झाला. तो संघर्ष नारायण राणे यांच्याशी कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि सिंधुदुर्ग आणि कोकणी माणसाची ताकद काय आहे, हे त्यांना दाखवून देऊ. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कुणी करू नये. कोकणाला मान आहे, स्वाभिमान आहे. तो या निवडणुकीत दाखवून देऊ, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.