Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून सातत्याने शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून शिंदे गटातील नेत्यांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून पलटवार केला आहे.
‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत. मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेले नाही. तर खेकड्यांनी ते पोखरले, असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर...
ते स्वतः म्हणजे धरण नाही, धरण हे कसे असते? धरण हे अभेद्य असते. मातीची जी धरणे असतात ती धरणे खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार भरभक्कम धरणांसारखे आहेत. अशी धरणे कधीही फुटू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून ते वेगळे झाले आहेत. त्यांच्या मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले होते, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही, या शब्दांत दीपक केसरकर यांनी पलटवार केला.
दरम्यान, विरोधकांच्या INDIA आघाडीबाबत बोलताना, अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन कधीही लढा उभा राहत नसतो. लढा हा देशाच्या हितासाठी असू शकतो. आज देशाचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदीच साधू शकतात आणि ही वस्तूस्थिती आहे, असे दीपक केसरकर यांनी नमूद केले. आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असे संजय शिरसाट म्हणाले.