Sharad Pawar Vs Shiv Sena Shinde Group: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी बंडखोरी करत थेट सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधिमंडळातील विधानसभेत या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागू शकते. विरोधी पक्षनेतेपदावर आता काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेत आमचे सदस्य जास्त आहेत, त्यामुळे आमचा विरोधी पक्षनेता व्हायला हवा, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यासंदर्भात काही काँग्रेस नेत्यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते. यावर, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी भाष्य करताना सूचक विधान केले आहे.
तिन्ही पक्षांमध्ये योग्य संपर्कच नाही
संजय गायकवाड म्हणाले की, इतक्या दिवसांत विरोधी पक्ष त्यांचा नेता निवडू शकले नाहीत, हे विरोधी पक्षाचे अपयश आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसरा आठवडा संपला आहे. परंतु अद्याप विरोधकांना त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही. कारण तिन्ही पक्षांमध्ये योग्य संपर्कच नाही. त्यांच्या कितीही बैठका होत असल्या तरी विरोधी पक्षनेतेपदावर एकमत होऊ शकलेले नाही, असे ते म्हणाले.
शरद पवारांच्या सल्ल्याने काँग्रेस चालणार, तोही पक्ष आता...
शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय होते ते सर्वांनी पाहिले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या सल्ल्याने चालली, काँग्रेसही पवारांच्या सल्ल्याने चालणार आहे. शेवटी शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय परिणाम झाला ते अजित गट बाहेर पडल्याने दिसले आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे दुसरा कुठला पक्ष महायुतीतून बाहेर पडतो का? हे येत्या काळात पाहावे लागेल, असे सूचक विधान संजय गायकवाड यांनी केले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीची आगामी काळातली भूमिका आणि निडणुकांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करावे, याबाबत शरद पवार काँग्रेसला सल्ला देतील असे बोलले जात आहे.