Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर यथेच्छ टीका करताना पाहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतील एका सभेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. याला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाने केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. २०१९ साली ज्या विचारांवर आम्ही निवडणूक लढवली त्या विचारांचा धागा पकडून आम्ही काम करत आहोत. हे आम्हाला गद्दार म्हणतायत, पण गद्दारी तर यांनीच केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली, तसेच ज्यांच्याबरोबर गेले ते यांना विचारायला तयार नाहीत, यांची साधी विचारपूससुद्धा करायला तयार नाहीत. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे की, सत्ता महत्त्वाची की हिंदुत्व महत्त्वाचे? कारण भगवा वाचवण्याचे काम आम्ही करतोय, असा पलटवार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरेंनी मालेगाव येथे झालेल्या सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधला.
आम्ही आमची ३८ वर्ष शिवसेनेसाठी घालवली
ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहिती, अशी टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली. तर, अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत, या शब्दांत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर सडकून टीकास्त्र सोडले.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. अंबादासने मला सांगितले की, बाई (सुषमा अंधारे) खूप डोक्याच्या वर झाली, असा दावा संजय शिरसाट यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"