Santosh Bangar News: गणेशोत्सवाची सांगता होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. शेवटच्या दिवशीही नेतेमंडळी, सेलिब्रिटी, भाविकांनी ठिकठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेतले. यावेळी संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नवसाचा मोदक घेतल्याचे सांगितले जात आहे.
हिंगोलीतील विघ्नहर्ता चिंतामणी बाप्पा नवसाला पावणारा असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा नवस पूर्ण होतोच, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी येथून मोदक घेतला, असेही त्यांनी सांगितले. मीडियाशी बोलताना बांगर म्हणाले की, विघ्नहर्ता चिंतामणी या श्रीचे या ठिकाणी दर्शन घेतले. मोदक घेतला आहे. हा मोदक २०१९ लाच घेतला होता. त्यावेळी साक्षात विघ्नहर्त्याने मनातील इच्छा पूर्ण केली. मी आता फक्त विघ्नहर्त्याला एवढेच साकडे घालेन की महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी राजाला सुखात ठेव, त्याच्या इच्छा पूर्ण होऊ देत, अशी माहिती बांगर यांनी दिली.
२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत
या विघ्नहर्त्याचं वैशिष्ट्य आहे. ज्याने इथे संकल्प सोडला त्याचा नवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. २०१९ ला आमदार व्हावे म्हणून माझ्या घरच्यांनी मोदक घेतला होता. एका वर्षाच्या आत विघ्नहर्त्याने ती इच्छा पूर्ण केली. हिंदुस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहावे आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्य राहावे, हे साकडे या विघ्नहर्त्याकडे घातलेले आहे. २०२४ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडून यावे याकरिता मी मोदक घेतलेला आहे. ही इच्छा श्री पूर्ण केल्याशिवाय राहणार आहे, असा विश्वास संतोष बांगर यांनी व्यक्त केला.