Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील नेते ठाकरे गटावर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच शिंदे गटातील खासदाराने २०१४ मधील एका घटनेची आठवण करून देत मोठा गौप्यस्फोट केल्याचे सांगितले जात आहे.
सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असले, तरी २०१९ मध्ये सत्ता आल्यानंतर मात्र शिवसेनेचा सर्वांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले नाही. २०१४ मध्ये तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल म्हणून पक्षाने ते स्वीकारलेच नाही, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसैनिक रस्त्यावर आणि त्याची झोळी रिकामीच राहिली, असे कीर्तीकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’, या स्वतःच्या राजकीय वाटचालीवर आधारित पुस्तक लिहिले असून त्यामध्ये हे सर्व दावे केले आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले, हे आश्चर्यजनक होते
राज्यात २०२९ महाविकास आघाडीची सत्ता आली. यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले, महत्त्वाची खाती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दिली. वास्तविक सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याची संधी असताना उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हे काहीसे आश्चर्यजनक होते, असे सांगत स्वतः पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते. शिवाय तीन पक्षांचे सरकार चालवण्याची कठीण कसरत तर होतीच. त्यामुळे संघटना बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे अशी कुजबूज संघटनेत सुरू होती. उद्धव ठाकरे नाहीत तर किमान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी तरी शिवसैनिकांना भेट द्यावी, अशी आशा असताना तीही फोल ठरली. आदित्यने संघटना बांधणीची सूत्रे हातात घेऊन राज्यभर फिरणे अपेक्षित असताना मंत्रिपद स्वीकारले. ज्याचा नकारात्मक परिणाम संघटनेवर झाला आणि पक्ष पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला, असेही कीर्तीकर यांनी पुस्तकात म्हटले आहे.
दरम्यान, शिवसैनिकांची पक्षनेतृत्वाशी भेट होत नसताना एकनाथने शिवसैनिकाला आधार दिला. दरबारी मंडळी मात्र कायम एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कारस्थान रचत आली. २०१४ नंतर मिळणारे शिवसेनेच्या वाट्याचे उपमुख्यमंत्रिपद केवळ एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल, या विचाराने ते पक्षाने स्वीकारलेच नाही. राजकारणात कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर पक्षाचा नेता. याचा विसर दरबारी मंडळींना पडला, अशी टीका कीर्तीकरांनी पुस्तकातून केली आहे.