Shiv Sena Shinde Group News: बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कायम आनंद दिघे यांच्याविषयी तक्रार करणे, त्यांच्याविषयी चुकीचे सांगणे हे काम संजय राऊत कायम करीत आले आहेत. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन आनंद दिघे यांना राजकारण परास्त करायची सुपारी घेतली होती. त्यामुळे आनंद दिघे व्यथित सुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला आनंद दिघे काय होते, ते शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आनंद दिघे गेल्यानंतर यांना कधी त्यांची आठवण आली का, अशी विचारणा करत शिवसेना शिंदे गटातील नेत्याने संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
ठाणे टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमात पैसे उधळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओवरुन शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. तसेच आता लुटीचा पैसा आनंद आश्रमात ठेवला जातो, असा आरोप कर आता आनंद दिघे असते तर त्यांनी त्यांच्या त्या प्रसिद्ध हंटरने पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना फोडून काढले असते, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला. याला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला
लुटीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप असेल तर तो धर्मवीर आनंद दिघे यांचा अपमान आहे. संजय राऊत दिघे द्वेष्टा माणूस आहे. दिघे यांचा या माणसाने कायम तिरस्कार केलेला आहे. या माणसाने कायमच दिघे यांना विरोध केला आहे. खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊत यांनी तेव्हा लोकप्रभामध्ये जो लेख लिहिला होता. त्यात काही गोष्टी त्यांनी लिहिल्या होत्या. त्यामुळे दिघे यांना टाडा लागला. दिघे यांना तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या, असा मोठा खळबळजनक दावा नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघे यांचे नाव देण्याचा ठराव या लोकांनी आम्हाला मागे घ्यायला लावला, या नाट्यगृहाला दिघे यांचे नाव देऊ दिले नाही. एवढा तिरस्कार ही मंडळी करायची. अशा प्रकारे जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवतालची, जी ठाकरे गटातील ठाण्यातील मंडळी आहे ती कोण आहेत? ज्यांनी कायम दिघे यांचा तिरस्कार केला. शिवसेनेत काम करत असताना दिघे यांच्याविरुद्ध शिवसेनेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला अशीच ठाणे जिल्ह्यातील मंडळी त्यांच्याबरोबर आहेत, असा आरोपही म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.