MP Shrikant Shinde:महायुतीत काही जागांवरून अद्यापही खल सुरू असताना, लवकरच तिढा सुटेल, असे सांगितले जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. यावरून विरोधकांनी टीकाही केली. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यावर आता खुद्द श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजपाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी भाजपा खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे मग त्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, हा विश्वास व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही
देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या उमेदवारीची घोषणी केली होती. त्याचे स्वागत करतो. मात्र, त्यांनी घोषणा केली असली, तरी माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष एका व्यक्तिपुरता मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर म्हणाल्या होत्या की, मला ऐकून आनंद झाला की, श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली. परंतु, माझ्या मनात एक शंका आहे. ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचे चिन्ह काय असेल? कमळ की धनुष्यबाण? कोणत्या चिन्हावर लढायचे हे त्यांनी ठरवले आहे का? याचसाठी सगळा अट्टाहास केला होता का? हीच नामुष्की ओढावली आहे की, त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काही फरक पडणार नाही. काय करायचे, ते आता कार्यकर्ते ठरवतील, असे वैशाली दरेकर यांनी म्हटले.