Thackeray Group Vs Shinde Group: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आणि शिंदे गटाने प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा. बिनकामी सगळी माणसे तुम्हाला घ्या, असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर आता यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे.
भाजप आणि शिंदे गटाने इतके प्रयत्न करूनही शिवसेना संपलेली नाही. इतके सगळे होऊनही शिवसेना संपत कशी नाही, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मात्र, मी भाजप आणि शिंदे गटाचा आभारी आहे. त्यांनी प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा. बिनकामाची सगळी माणसे तुम्हाला घ्या. पण, यामुळे शिवसैनिक हे पुन्हा पेटून उठतात. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट जे काम करत आहे, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना पुन्हा नव्याने जोमाने उभी राहत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. यावर श्रीकांत शिंदे यांनी भाष्य करत प्रत्युत्तर दिले.
एक-एक करून सगळेच याठिकाणी येणार आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, त्यांच्या टीकेला आपण कामाने उत्तर देऊ. तसे आम्ही कामाने उत्तर देत आहोत. पदाधिकारी आणि नगरसेवकांचे प्रवेश येणाऱ्या काळात अजून वाढणार आहेत. कोणीतरी सांगितले, ‘एक-एक करून काय घेता, सगळेच घ्या.’ तुम्ही काळजी करू नका, एक-एक करून सगळेच याठिकाणी येणार आहेत. आपल्या कुटुंबातील लोक का सोडून जात आहेत? याचे अगोदर आत्मपरिक्षण करा. त्यानंतर सर्व उत्तर मिळतील, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे हे निष्ठावंत होते. त्यांचे गद्दारांबरोबर नाव जोडू नका, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्यावर प्रश्न विचारताच श्रीकांत शिंदे संतापले. पुन्हा त्यांचे प्रश्न विचारत जाऊ नका. आम्हाला तेवढा वेळ नाही आहे. आम्हाला चांगली कामे करायची आहेत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.