MP Shrikant Shinde News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही बैठका, मेळावे यांचे सत्र सुरू झाले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी तीनही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे जनसंवाद मेळावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना, विधानसभा निवडणुकीत विधानसभेसारखी परिस्थिती असणार नाही, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा खासदार श्रीकांत शिंदे घेणार आढावा घेणार आहेत. तसेच काही बैठकाही घेण्यात येणार आहेत. पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच टीकास्त्र सोडले. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. गेल्या २ वर्षांत सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे. लोकसभेत गैरसमज पसरवून तुम्ही लोकांचे मत घेतली, ते आता विधानसभेत होणार नाही. तुमची सत्ता असताना अडीच वर्षात फक्त घरी बसण्याचे काम केले. सगळ्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम तुम्ही केले, या शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी हल्लाबोल केला.
कोण कुठल्या जागेवर निवडणूक लढतील यावर निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल
कोण कुठल्या जागेवर निवडणूक लढतील यावर निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आता फक्त पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आहे. लाडकी बहीण योजनेबाबत माहिती घेतली आहे. योजना जाहीर झाल्यानंतर लाभार्थींना काही अडचणी येत आहेत का याबाबत आढावा घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, लग्न होत नाही, सत्ता येत नाही म्हणून राहुल गांधी जुडो कराटे खेळत असावे. काहीतरी मनोरंजन लागेल ना त्यांना, पोरगा आहे खेळू द्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाचा आलेख चढता आहे. मोदी है तो मुमकीन है हेच सत्य आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.