Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत केल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. काही झाले तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
वरळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत मनसे काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीची चाचपणी सुरू झाली असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. वरळीतून निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितले होते की, सर्वजण ही सीट पाहायला येतील. वरळी ए प्लस होत असताना सगळीकडून लोक येतात. सर्वांचे स्वागत करतो. काही मोठ्या लोकांनी या ठिकाणी रोड शो करावा, अशी माझी विनंती आहे. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आता आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणुकीला उभे राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात, हे पाहावे लागेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, वरळीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षा होती की, ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. परंतु, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त ६ हजार मताधिक्य मिळाले. त्यांना वाटत होते की, मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे. हे लोकांनी दाखवून दिले. या ठिकाणी १९ टक्के मतदान शिवसेनेला पडायचे त्यापैकी १४ टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झाले, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.