Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात गौप्यस्फोटांची मालिकाच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांसंदर्भात गौप्यस्फोट केला. त्यानंतर ही मालिका वाढत गेल्याचे दिसत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाढत्या संघर्षामुळे दोन्ही गटातील नेते दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट करत आहेत. यातच आता शिंदे गटातील नेत्याने अजित पवार आणि रोहित पवार यांच्यासंदर्भात एक गौप्यस्फोट केला असून, यावरून आता चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.
अजितदादांनी निवडणुकीत रोहित पवारांना पाडायचा प्रयत्न केला होता
जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार निवडून आले होते. मात्र, आता या निवडणुकीवरून राजकारण पेटण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे. पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपले घरातले बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असा पलटवार म्हस्के यांनी केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.
स्वतः च्या पक्षामधे एकमत करा की भावी मुख्यमंत्री उमेदवार कोण...
आधी स्वतः च्या पक्षामधे एकमत करा की, भावी मुख्यमंत्री उमेदवार कोण आणि मग इतरांवर टीका करा. अजित दादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचा बॅनर लावला गेला , सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहेत का, असा खोचक सवाल नरेश म्हस्के यांनी केला.
दरम्यान, नरेश म्हस्के यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. नरेश म्हस्के तुम्ही मध्यंतरी काय केले हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही शिवसेना या पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला गद्दार म्हणत आहे. स्वतःच ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून हे बंद करा. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजित पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, या शब्दांत सचिन खरात यांनी सुनावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"