Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटाने संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हा पंतप्रधानपदासाठी एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे
खासदार संजय राऊत हे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतात कारण संजय राऊत यांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. ज्या लोकांना आपले ४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाहीत. ज्या प्रमाणे नेते त्यांना सांभाळता आले नाहीत, त्यांना पक्षही सांभाळता आला नाही. राजकारणातील सत्तापिपासू वृत्तीमुळे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपले ज्यांनी आपले विचार सोडले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जाऊन बसले ते देश काय सांभाळणार आहेत, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांचा चेहरा असू शकत नाही आणि मोदींसमोर ते टक्कर देऊ शकत नाही, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे, शेवटी या देशातील मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येते. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"