Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून भाजप, शिंदे गट आणि आता थेट निवडणूक आयोगावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊतांनी हा न्याय नाही, डील असल्याचा आरोप केला आहे. याला शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे.
संजय राऊतांचे डोके ठिकाणावर आहे का?
संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारावा वाटतो. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यांनी एक सुपारी घेतली होती, शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडून असेल, कोण म्हणते शरद पवार यांनी त्यांना सुपारी दिली होती. शिवसेना संपवण्याची आणि त्यांनी त्यांचे काम फत्ते केलेले आहे. लोकशाहीमध्ये न्याय जिवंत आहे आणि आता त्यांच्या विरोधात निर्णय दिला की, न्यायालयावर टीका करणार, या शब्दांत नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मजबूत पुराव्यामुळे लागला आहे. संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचे महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहे. महाराष्ट्र सुजाण आहे. राज्यातील जनता संजय राऊत यांच्यांसारख्यांच्या विधानांवर कुठलीही भीक घालत नाही, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"