Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हळूहळू मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे या बैठकीचे यजमानपद आहे. अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद देण्यात आले. यानंतर वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार असून, एक मोठा गट लवकरच महायुतीत सहभागी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसमधला मोठा गट नाराज आहे. हा बड्या नेत्यांचा गट अस्वस्थ असल्याने ते लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत. हे नेते महायुतीमध्ये सहभागी होतील, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे
शिवसेनेचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि एक मोठा गट महायुतीमध्ये सहभागी झाला. आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेस पक्षातील एक मोठा गट महायुतीमध्ये सहभागी होईल, असा दावा प्रतापराव जाधवांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असे सांगितले जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत.