Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार तीव्र होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाल्याचे म्हटले होते. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.
मीडियाशी बोलताना रामदास कदम यांनी मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधारी पक्षातील आमदार सरकारविरोधात आंदोलन कसे काय करू शकतात, हेच मला समजत नाही, असे विधान रामदास कदम यांनी केले. तसेच मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. दिलीप वळसे पाटील पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचे गेट बंद केले, हेच मला कळत नाही, अशी शंका रामदास कदम यांनी उपस्थित केली.
दरम्यान, एकमेकांचे खासगी आयुष्य काढण्यापर्यंत विकोपाला गेलेला शिवसेना गटाचे नेते रामदास कदम खासदार गजानन कीर्तिकर यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपल्या वाणीला विराम दिला आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. या प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया कीर्तिकरांनी दिलीय तर रामदास कदम यांनीही भाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, शंभर टक्के वाद मिटला आहे, असे विधान केले आहे.