Ramdas Kadam : राज्यात विधानसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार चर्चा सुरु आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वारंवार चर्चा आणि बैठका होत आहे. दुसरीकडे ऐन निवडणुकीत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील मतभेदामुळे महाविकास आघाडी तुटल्याचे काही तासांमध्ये समोर येईल असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. मला मिळालेली माहिती ही गोपनीय असल्याचेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात राजकारणात अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. यापूर्वीही रामदार कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करताना अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी फुटणार असल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
"उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड मतभेद झालेले आहेत. महाविकास आघाडी फुटली हे काही तासांमध्येच महाराष्ट्राच्या समोर येणार आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचा आव आणतात. खरे पक्षप्रमुख असते तर शरद पवार यांच्या मांडीवर बसले नसते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुढघ्याला बांधून बसले आहेत. काँग्रेसचे नाना पटोलेही मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुढघ्याला बांधून बसलेत," असं रामदास कदम यांनी म्हटलं.
"शरद पवार यांची ओळख देशालाच नाही तर जगाला आहे. शरद पवार अशी गुगली टाकतील ते दोघांनाही संपवून टाकतील. २४ तासामध्ये महाराष्ट्राला अनुभव येईल की, उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाजूला झालेली असेल, " असेही रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे म्हटलं होतं. "आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही सगळे रात्रंदिवस मिळून काम करत आहोत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी उध्दव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसचा पराभव होईल," असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.