Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरला जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे
संपूर्ण भारतवासीयांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. ज्या प्रमाणे धर्म पाहून पर्यटकांना मारले. जे कृत्य १९८७ पासून काश्मीरमध्ये सुरू होते, वाहने अडवायची, माणसे खाली उतरवायची, कपाळीचे कुंकू पाहायचे आणि अत्याचार करायचे, पुरुषांना गोळ्या घालायच्या हे जे क्रूर कृत्य पाकिस्तान केले आहे, जे लोक सांगतात की, दहशतवादाला चेहरा नसतो, त्यांना जाहीरपणे सांगतो की, हा इस्लाम आतंकवाद आहे. हा पाकिस्तानचा आतंकवाद आहे. जम्मू काश्मीरमधील हिंदू लोकांना, भारतीय हिंदू लोकांना संपवण्यासाठी दहशतवादी हल्ले केले जात आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी खंबीरपणे भूमिका घेऊन २६चा बदला २६०ने कसा घेतला जाईल आणि यांना हाती लागले की, कसाबसारख्या मेजवान्या देऊ नका, यांच्या माना छाटल्या पाहिजे, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधी आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला भारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.