Shiv Sena Shinde Group Sanjay Nirupam News: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत मुस्लिम समाजात विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. केंद्र सरकारने भारतातील मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांनासाठी सच्चर आयोग स्थापन केला होता. या आयोगाने वक्फ बोर्डाचे कामकाज पारदर्शक करण्याची शिफारस केली होती. भारतात वक्फ बोर्डाच्या ९ लाख मालमत्ता आहेत. यात २ कोटी ३० लाख एकर जमीन आहे. ताजमहल, चारमिनार, जामा मस्जिद आणि लाखो दरगाह, हजारो दुकाने, मजारे, मदरशे, मस्जिद आहेत. या सगळ्या मालमत्तांचे पारदर्शक व्यवस्थापनाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, गोरगरिब मुस्लिमांचे कल्याण करण्यासाठी वक्फ बोर्ड वार्षिक उत्पन्नातून खर्च करु शकते. या सर्व मालमत्तांमधून वार्षिक १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असे निरुपम म्हणाले. मात्र वक्फ बोर्डालाच कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडून अनुदान घ्यावे लागते, असे निरुपम म्हणाले. त्यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. यामुळे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता त्यांची आर्थिक स्थिती याची वास्तववादी माहिती समोर येईल, असे ते म्हणाले.
वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला देशभरातील विविध राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात शिवसेनेसह एनडीएमधील सर्वच पक्षांनी वक्फ बोर्ड सुधारणेला सहमती दर्शवली आहे, मात्र विरोधी पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या विधेयकाला विरोध करत आहेत. यात महाराष्ट्रातील ठाकरेंच्या पक्षाची सर्वात मोठी अडचण झाली आहे. ठाकरे गटाच्या ९ खासदारांमध्ये वक्फ बोर्ड विधेयकावरून मतभेद आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे काही खासदार वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत आहेत. काल त्यांच्यात रात्री उशिरापर्यंत मतभेद सुरू होते. मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी ठाकरे गटाकडून वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला जाईल, अशी बोचरी टीका निरुपम यांनी केली.
दरम्यान, जेव्हा संसदेत पहिल्यांदा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्यात आले होते तेव्हा ठाकरे गटाचे खासदार संसदेतून पळून गेले होते. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे, त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन बाळासाहेब विरोधी भूमिका घेणार का? ठाकरे गटाने काँग्रेसच्या सेक्युलर विचारांना स्वीकारले आहे का, हिंदुत्वाशी कायमचे नाते तोडणार आहेत का, मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाचे तेही शिकार झाले आहेत का हे आता स्पष्ट होणार आहे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.