Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये लोकसभा निवडणूक निकालावर केलेले भाष्य, अजित पवारांच्या समावेशावर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह, छगन भुजबळांची नाराजी आणि विधाने, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची दाखवलेली तयारी, यावरून महायुतीत तणाव असल्याची चर्चा आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी महायुतीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचे विधान केले आहे.
पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे. टक्केवारीचे राजकारण मांडले जात नाही. ठाकरे गटाने लढवलेल्या जागा २२ आहेत. शिवसेनेने लढवलेल्या जागा १५ आहेत. त्याच्याशी तुलना कशी करणार? त्या तुलनेत आमचा जो स्ट्राईक रेट आहे, तो ४६ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आमच्या जागा त्या तुलनेत जास्त आहे. महायुतीत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आम्हीच मोठा भाऊ आहोत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणेल तसा पक्ष चालत असेल तर...
तुम्ही काय कमावले, गमावले, अशी विचारणा करत, हे चित्र बदलले नाही, तर भविष्यात तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. आताही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे काय नुकसान याचे चिंतन मनन केले पाहिजे. संजय राऊत म्हणेल तसा पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनीही संजय शिरसाट यांची री ओढत, महायुतीत आम्हीच मोठे भाऊ आहोत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, भुजबळ कोणत्या गोष्टीवर नाराज आहेत, हे अजित पवार यांनी पाहावे. त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. अनेक ज्येष्ठ लोकांना टाळले जाते. अनेकांना न्याय मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि छगन भुजबळ यांची नाराजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.