Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला. यामुळे आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी झाल्यानंतरही पक्षप्रवेशाचे मोठे दावे केले जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत वाट पाहा, महाविकास आघाडीतील काही बडे नेते महायुतीत आलेले दिसतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
डिसेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. हिवाळी अधिवेशन एक पिकनिक म्हणून पाहिले जाते. परंतु, हे अधिवेशन आमचे सरकार जनतेच्या मदतीसाठी प्रश्न जाणून घेण्यासाठी घेणार आहे. त्यामुळे कालावधी वाढला असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच आघाडीतील मोठे नेते महायुतीत ३१ डिसेंबरपर्यंत येतील. कदाचित नव्या वर्षांत येतील. सगळ्या गोष्टी आताच उघड करीत नाही. मात्र, ३१ डिसेंबरपर्यंत वाट पाहा, असे सूचक विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री सक्रीय आहेत
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री सक्रीय आहेत. विधानसभेत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार का, यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यांची भूमिका आरक्षणाबाबत अत्यंत स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जाणार आहे. नेत्यांनी विविध विधाने केल्यामुळे वाद निर्माण होत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करु नयेत, असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले आहे.
दरम्यान, सत्ता गेल्यामुळे विरोधक विचलित झाले आहेत. सत्तेचा वापर जनतेसाठी करायचा असतो हे लोक विसरले होते. यांच्या काळात थांबलेली कामे आता शिंदे सरकारच्या काळात सुरु झाली आहेत. ‘फायली अडवा आणि फायली जिरवा’ हा प्रयोग आघाडी सरकारमध्ये झाला, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.