Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असलेला दिसत आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती तुरुंगात जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.
कोरोना घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावले का? उगाच कस्टडीत घेतले का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते. तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर कोर्ट सोडते ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून होत नाही. त्यांना मदत करणारे जे कोणी असेल त्यांना सांगतो. आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार
या प्रतिक्रियेवर कोण तुरुंगात जाणार असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला होता. यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल अनिल परब असेल ठाकरे कुटुंबातील कोणी असेल ते आत जाणारच ना? असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत फक्त बडबड करतात. त्यांना कुठे काय बोलावे हे कळत नाही. हेलिकॉप्टर नाही उडणे, जेवण डिप्लोमसी यावर त्यांची बेताल बडबड सुरू आहे. अडीच वर्ष ज्या मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसता आले नाही, त्यांच्या लोकांना हे बोलावे? तुम्हाला सत्तेच्या खुर्चीत बसता आले नाही हा तुमचा पायगुण होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला जेवणाची पंगत ठेवण्याची गरज नाही. शिंदे कधीच एकटे जेवत नाहीत. त्यांच्यासोबत रोज चार पाच आमदार असतात, असे शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.