“अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला...”; शिंदे गटातील नेत्याचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:21 PM2023-07-05T12:21:13+5:302023-07-05T12:22:10+5:30
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. एकीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे, अजित पवार यांना अर्थखात्याचा पदभार मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता शिंदे गटातील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हालाही फायदा होणार आहे. राष्ट्रवादी आल्याने कोणी नाराजी व्यक्त केली असेल, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्याची दक्षता घेतील, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला...
राष्ट्रवादीला विरोध होता की, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्याने बाहेर पक्षातून बाहेर पडला? या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, आमचा राष्ट्रवादीला विरोध होता. अजित पवार हे त्यांच्या पक्षासाठी ताकदीतने काम करत होते. मी निधीसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तेव्हा ते म्हणायचे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. पण, उद्धव ठाकरे भेटतही नव्हते आणि फोनही उचलत नव्हते. अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला अडचण नाही. एकनाथ शिंदे हे २४ तास सर्वांना उपलब्ध असतात. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार दोन-तीन दिवसांत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत, भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष, शिंदे गटाचे पायपुसणे केले आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना, आम्हाला बहुमताची गरज होती का? आमचे मन मोठे आहे. सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा विकास करू इच्छितो आहे. भाजप शिवसेनेबरोबर पहिल्यांदा युती केली असती, तर काय झाले असते, असा उलटप्रश्न शिरसाट यांनी केला.