Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. एका सभेत बोलताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शब्द दिला होता. पण आता खोटे बोलत आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. यावर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्याने पलटवार केला आहे.
तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटे बोलत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी ज्या सभेत अमित शाह खोटे बोलतात असे म्हणाले. त्यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजपा आणि नंतरची शिवसेना असे होते. पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपाने हे मान्य केले कीस आधीची अडीच वर्षे देतो. हे खोटे आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले.
शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती
भाजपासोबत जायचे नाहीच. हवे तर एकनाथ शिंदे तुम्ही बोला पण, मी जाणार नाही. हे यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. प्रश्न नीतिमत्तेच्या असेल तर त्यांनी शपथपूर्वक सांगावे, असे शिरसाट म्हणाले. तसेच जागावाटपावर बोलताना ते म्हणाले की, जागावाटपाबाबतच्या तुमच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत, असे शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिले आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्या निकालावर टीका करण्याचा जो प्रयत्न केला, हे समजून घेतले पाहिजे की, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले नाहीत किंवा स्टे आणला नाही. नार्वेकरांनी दरवेळेला त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, राऊतांना जाणीव होती की आपण चुकीची घटना सादर केली आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.