“जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:04 IST2025-03-22T17:01:13+5:302025-03-22T17:04:08+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: बंद दाराआड ३५ मिनिटे चर्चा होत असेल, तर काय अन् कसे सुरू आहे, नुसते हे तर विचारले नसेल. अजितदाद आणि जयंत पाटील यांच्या निश्चित राजकीय बोलणे झाले असेल, असा दावा करण्यात आला आहे.

“जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. महायुती सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आला. नागपूर येथे मोठा हिंसाचार झाला. यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवरूनही महायुतीवर विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत शरद पवार-अजित पवार एकत्र असणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी झाली होती. परंतु जयंत पाटील भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा झाली, असे सांगितले जात आहे. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की
मी अनेक वेळा सांगितले आहे की, जयंत पाटील तिथे अस्वस्थ आहेत, त्यांना करमत नाही. यापूर्वीच ते अजितदादा यांच्याबरोबर येणार होते. पण, काय झाले हे माहिती नाही. त्यांच्यात बंद दाराआड ३५ मिनिटे चर्चा होत असेल, काय कसे सुरू आहे, नुसते हे तर विचारले नसेल. त्यांचे निश्चित राजकीय बोलणे झाले असेल. काही चर्चा झाली असेल. पण, मला त्याबाबत कल्पना नाही. मात्र, भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, संजय राऊत यांनी या घडामोडींवर केलेल्या भाष्यासंदर्भात संजय शिरसाट यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, ज्यांनी गद्दारी केली ते असे बोलतात का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसणारे निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. यामुळेच यांनी सगळा पक्ष संपवला. संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमके उलट घडते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून यापुढे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत स्फोट होईल, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.