Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: ठाकरे गट ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढत आहे. याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाकडून घणाघाती टीका करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मोर्चा कुठून काढणार आणि कुठे जाणार माहिती नाही. पण आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवर येणार. गेली २५ वर्ष यांनीच भ्रष्टाचार केला आहे, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या मोर्चावर हल्लाबोल केला.
स्थायी समितीचे सभापती असतील किंवा महापौर असतील ती यांची प्यादी होती. टक्केवारी ठरलेली होती. आता महानगरपालिका हातात नाही, म्हटल्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आव आणला जात आहे. असे धाडस ते कसे करू शकतात. चोर मचायें शोर, हे त्यांना लागू होते, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. आदित्य ठाकरेंनी बाबांना जाऊन विचारावे. आपल्याकडे किती वर्ष सत्ता होती. आपण काय दिवे लावलेत. मुंबईत इतके खड्डे कसे, मुंबई इतकी बकाल का झाली, रस्त्यात पाणी का साचते, बाबा आपल्याला पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये का राहावे लागले, असे सगळे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारायला हवेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का?
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढायची आहेत. एकेक मासे आता गळाला लागत आहेत. म्हणून त्यांची फडफड सुरू झाली आहे. त्यांना माहिती आहे की, उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. आदित्य ठाकरे असो किंवा कुणीही असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, तो जेलमध्येच राहील. आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठा आहे का, अशी विचारणा करत शिरसाट पुढे म्हणाले की, कोणताही पुढारी कायद्यापेक्षा मोठा नाही. जो करेल, तो भरेल. हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, केंद्रात फेरबदल होणार आहेत. काही संकेत आम्हालाही मिळाले आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री तिथे जातील, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला ते हातभार लावू शकतात, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.