Shiv Sena Shinde group Sanjay Shirsat News: ऑर्गनायझरनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS शी संबंधित आणखी एका साप्ताहिकाने लोकसभा निवडणुकीवर स्पष्ट शब्दांत भाष्य करत अजित पवारांनामहायुतीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही, असे या लेखात म्हटले आहे. या लेखावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून महायुतीवर सातत्याने टीका केली जात आहे.
अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशानंतर आरएसएसच्या साप्ताहिकांमध्ये टीका करण्यात आल्यानंतर आता भाजपाची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच अजित पवारांनी पक्षातून वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु, ते आजही कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब वेगळे होत नाही, असे सूचक विधान केले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार महायुतीसोबतच राहणार की वेगळी भूमिका घेणार, अशी चर्चा राजकारणात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी सूचक विधान केले आहे.
राजकारणात कधीही काही घडू शकते
अजित पवार हे महायुतीतच राहतील, अशी आमची अपेक्षा आहे. पण राजकारणात कधीही काही घडू शकते, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याचा अर्थ विस्तार होईल. पण तो कधी होईल ही वेळ कुणी सांगू शकत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंधराशे रुपयांमध्ये घर चालत नाही. हे आम्हालाही मान्य आहे. आमची द्यायची तयारी आहे. तुमच्याकडे ती दानत आहे का, तुम्ही कधी दिले ते तरी सांगा. सरकारच्या योजनेचा आम्हाला फायदा होतो ही सामान्यांची भूमिका आहे. लोकसभेत काय निकाल लागले सगळ्यांना माहिती आहेत. स्वत: शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केले हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा. संजय राऊत कधी लोकांना भेटत नाही कधी ग्राउंडवर जात नाही. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण ठाकरे गटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.