Shiv Sena Shinde Group News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा जोमाने कामाला लागत महायुती विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयासाठी प्रयत्नशील असून, लोकसभेतील विजयी लय कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असताना, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत थेट भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार बसून यावर निर्णय घेतील. या निवडणुकीच्या जागावाटपासाठी चर्चेच्या चार फेऱ्या होतील. आम्ही तिन्ही पक्ष जिंकण्याच्या ईर्शेने निवडणुकीत उतरणार आहोत. महायुती जास्तीत जास्त जागा कशी जिंकेल याकडे कल असेल, असे संजय शिरसाट म्हणाले.
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देईल
सरकार आपली भूमिका मांडत आहे. योग्य पद्धतीने मराठ्यांना न्याय देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देईल. मनोज जरांगे पाटील यांना एवढेच सांगतो की, आम्ही कॅम्प घेऊन दाखले दिले आहेत. आम्हाला दाखले द्यायचेच नसते तर मग आम्ही कॅम्प कशाला घेतले असते? खऱ्या नोंदी आहेत त्यांना आम्ही दाखले देत आहोत. बोगस नोंदीवाल्यांना आम्ही दाखले देत नाही. याबाबत सरकार गंभीर आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाची चुकीची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी तीन मोठे नेते एकत्र बसतील. त्यावेळी फायनल फॉर्मुला ठरेल. जेव्हा तीन मोठे नेते एकत्र बसतील. त्यावेळी या फॉर्मुलावर चर्चा होईल. तोपर्यंत हा फॉर्म्युला अंतिम समजला जाऊ शकत नाही, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.