Shiv Sena Shinde Group: रत्नागिरीतील काँग्रेसचे सहदेव बेटकर यांनी मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णाची उपमान दिली. यावरून आता शिवसेना शिंदे गटाकडून संजय राऊतांवर पलटवार करताना खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.
आमच्या पक्षात आला सहदेव आले आहेत. महाभारतातील तीन पात्रे येथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, मी संजय आहेच आणि सहदेव हे फार महत्त्वाचे पात्र होते. धर्मराजाच्या अत्यंत जवळचे कोण असेल, तर सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आलेला आहे. सहदेवांच्या येण्याने कोकणातील कुरुक्षेत्रावर जे नवे महायुद्ध सुरू आहे आहे, ते युद्ध आपण जिंकणार आहोत. सहदेवांना सांगितले आहे की, आता हे शेवटचे मैदान, आता मैदान बदलायचे नाही, असे संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे 'उद्धव' हे नाव, भगवान श्रीकृष्णांची अनेक नाव होती, त्यात उद्धव एक नाव होते, असे सांगितल्याचे राऊत म्हणाले. यावर आता शिवसेना शिंदे गटातील नेते शहाजी बापू पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.
संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे हे…
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे, महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाच्या जवळ नव्हता तर आंधळ्या धृतराष्ट्राच्या जवळ होता, त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असे म्हणायचे होते का? राऊत यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करून बोलावे. विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुंतत चालले आहेत, हे मला कळत नाही. संजय राऊत हे ट्रम्प, मोदी, चीन, जपान यांच्यावर का बोलत आहेत? गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली. त्यामुळे शेअर बाजार हा इतर देशाच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला. पंतप्रधान मोदींवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका, आधी वॉर्डात निवडून यायचे बघा, अशी खोचक टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.
दरम्यान, मंत्री कोकाटे यांचा स्वभाव हा खेळकर आहे, त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर केलेला हा खेळकर संवाद होता. तो काही त्यांच्या अंतःकरणातला संवाद नाही, अशी प्रतिक्रिया शहाजी बापू पाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्यावर केली.