Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाण्यातील एका सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना खुले आव्हान देताना टीका केली. यावर आता शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्या, तुमच्याविरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो, असे खुले आव्हान देत, अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही. पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात. असे हे राज्यातील गरिब शेतकरी असल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी पलटवार केला आहे.
येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन बघावे की, किती आधुनिक शेती केली आहे. आदित्य ठाकरे यांनी कधी शेती केली नाही वा शेतात काम केले नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे नव्हे तर महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. आदित्य ठाकरे आरोप करतात आमवस्या पौर्णिमेळा रात्री शेती करतात, आदित्य यांना सांगायचे तुम्ही शेती पाहायला जावे, सवड काढून शेती पाहावी, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला.
युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही
आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. २०१९ ला वरळीमधून ते लढले. पण दोन दिग्गच माजी आमदारांना विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली? ज्यांना निवडून यायला दोन विधान परिषदेच्या जागा द्यावा लागतात आणि नंतर विधानसभा निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच असून, मुख्यमंत्र्यांवर भाष्य करू नये, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.