Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला, तेव्हा छगन भुजबळ हेही उपस्थित होते. मंत्रिमंडळाची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आता अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही समाजाच्या, जातीच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का न लावता मराठा समाचाला आरक्षण द्यायचे आहे. अशातच छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि जबाबदार मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे त्यांनाही माहिती आहे. या सर्व प्रक्रियेत ते सहभागी आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. यावरून आता प्रतिक्रिया उमटत असून, शंभुराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर सविस्तर भाष्य केले.
छगन भुजबळांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये
कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. तसेच हे सगळे मुद्दे क्रिस्टल क्लियर आहेत. ओबीसी असतील किंवा अन्य जाती-धर्माचे समाजाचे असतील, अन्य कुणाचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे, असे बिलकूल नाही. छगन भुजबळ यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शंभुराज देसाई यांनी केले. याप्रकरणी शक्य झाले तर लगेचच किंवा मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत आणि आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.
दरम्यान, छगन भुजबळ यांची अशी भडक विधाने करायची जुनी सवय आहे. त्यांना काही वेगळे वाटत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी. ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्यांना दिलेच जाणार नाही. अशी शक्यताही नाही. मात्र, आपले आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार आहे, असे भासवायचे आणि तुमचे जाणारे आरक्षण मी थांबवले, असे सांगायचे, मोठेपणा घ्यायचा, असे आता वाटू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मराठा आरक्षणाचा विषय योग्य ट्रॅकवर आहे. तसेच न्यायाधीश महोदयांना आम्ही विनंती करून मनोज जरांगे यांची भेट घेण्यास सांगितले होते. मात्र, छगन भुजबळ यांनी त्यावर आक्षेप घेतला. वास्तविक त्यांना ही सगळी परिस्थिती आणि प्रक्रिया माहिती आहे. तरीही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हे १०० टक्के चुकीचे आहे, या शब्दांत शंभुराज देसाई यांनी हल्लाबोल केला.