Shiv Sena Shinde Group Shrikant Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता ओमर अब्दुल्ला यांच्या एका विधानावरून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात येईल, असे महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केले होते. याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर ओमर अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला. काश्मीरमध्ये आपण सत्तेवर आलो, तर महाराष्ट्र सदनाचे बांधकाम थांबवण्यात येईल. महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असा पवित्रा ओमर अब्दुल्ला यांनी घेतला. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत ठेवा
ओमर अब्दुल्लांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. ज्या लोकांनी इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले, अशा लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की, ओमर अब्दुल्ला जेव्हा म्हणाले होते की, महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये कसे होते तेच बघतो, तेव्हा त्यांना एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचे काम केले. तेथेच राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात. इंडिया आघाडीतील नेत्यांचे स्वागत केले. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांना जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल, या शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द काढलेला नाही
अडीच वर्षं तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली.२०२४ ला आपण एकटे न पडता सत्तेत कसे येऊ या दृष्टीने तुम्ही लाचारी पत्करली आहे. महाराष्ट्रद्वेष ज्यांच्या अंगात भरलेला आहे, अशा ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द त्यांनी काढलेला नाही. त्यांना ती हिंमतही होणार नाही, या शब्दांत निशाणा साधताना, काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्राचे जातात. सर्वाधिक पर्यटन उत्पन्न काश्मीरला महाराष्ट्रातून मिळते. काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.