Uday Samant News: अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मेळावे, प्रचारसभा, बैठका घेतल्या जात आहेत. यातच महायुतीच्या प्रचारावेळी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमध्ये महायुतीची प्रचारसभा घेण्यात आली. या सभेवेळी उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड फेकण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळमध्ये सभेसाठी आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय सामंतही होते. अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावून उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील कारची काच फुटली आहे. राळेगावमधील प्रचारसभेवेळी ही घटना घडली आहे.
माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही
वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी राळेगावमध्ये असताना, ज्या वाहनात बसणार होतो, त्या कारवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कारची काच फुटली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री करून घेतली. तेव्हा हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे. हा अनुभव मला काही नवीन नाही कारण पुण्यामध्ये ही अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर झाला होता. परंतु, हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेले नाही. दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलीसांकडे देण्यासाठी कार चालकास पाठवले आहे, अशी सविस्तर माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी जात असताना वाटेत काही अज्ञात लोकांनी उदय सामंतांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेक केली. यात कुणीही जखमी झालेले नाही. दगडफेक नेमकी कुणी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.