Shiv Sena Shinde Group Uday Samant News: राज्यासह संपूर्ण देशभरात श्रीराम नवमीचा उत्साह दिसून येत आहे. देशभरातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गावडे आंबेरे येथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी मोठा दावा केला.
उदय सामंत म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्याबाबत संजय राऊत यांच्या आरोपांना काही अर्थ नाही. सर्व सामान्य मुस्लिम बांधवांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. ज्या लोकांना वाटत आहे की, आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते या विधेयकानंतर महायुकीकडे जाणार आहेत, या भीती पोटी मुस्लिम समाजात गैरसमज परसवण्याचे षड्यंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखले आहे. तसेच मुस्लिम लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर सर्व सामान्यांसाठी हे विधेयक आणले आहे, अशी टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे काही नेते येत्या महिन्याभरात आमच्या पक्षात येतील
एकनाश शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहेत, त्यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून धोका होता त्यावेळी त्यांची सुरक्षा काढली होती. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सुद्धा काढली होती, त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले जात होते. गिरीश महाजन यांना मकोकाखाली अटक करण्यात येणार होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गोष्ट खरी आहे, अशी पुष्टी उदय सामंत यांनी जोडली. तसेच उद्धव ठाकरे गटांनी १०० उमेदवार उभे केले होते त्यातील ५० लोक निवडून आणायला पाहिजे होते. १०० जागा घेऊन तुम्ही २० निवडून आणले त्यामुळे तुमचा रिझल्ट २० टक्केच आहे. एकनाश शिंदे यांचा रिझल्ट ८६ टक्के आहे, असे सांगत ठाकरे गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सांगत नाही ती प्रक्रिया येत्या महिन्याभरात संपेल, असा दावा उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, श्रीरामाचा आर्शिवाद घेण्यासाठी राम मंदिरात आलो. येत्या एक महिन्यात रत्नागिरीचे बस स्थानकाचे लोर्कापण होणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.