मुंबई – राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडला. अजित पवार सरकारसोबत येणार हा भाजपच्या रणनीतीचा भाग होता. मात्र या घडामोडीमुळे शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात भाष्य करत अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल. शिवसेनेकडून त्यांचे मनःपूर्वक स्वागत, शंकाकुशंका उद्भवण्याची गरज नाही असं विधान केले आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सोबत घेऊन परिपक्व राजकारण करणारे नेते आहेत. महाविकास आघाडीतून अजित पवार यांनी बाहेर येऊन महायुतीत प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल. याबाबत कोणत्याही शंकाकुशंका निर्माण करण्याची गरज नाही, आम्हा सर्वांसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सांघिक आहे. शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन घेतलेला निर्णय आहे. शिवसेना भाजपने एकत्र येऊन महायुती वाढवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. या निर्णयामुळे कोणीही दुखावलेले नाही. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहायला हवेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे असं सामंत यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्याच्या विकासासाठी व्यापकपणे घेतलेला निर्णय आहे. आमच्यावर गद्दार, खोके अशी सकाळी उठल्यापासून टीका करणाऱ्यांना शपथविधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार महायुतीत आल्यानें अनेकांची तोंडे बंद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा सरकारला व राज्याला लाभ मिळेल असं म्हणत हे तिघे नेते एकत्र आल्याने महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, नेहमी नकारात्मक बाबी करणाऱ्यांनी या शपथविधीनंतर आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. उबाठाच्या मोर्चात सर्व भाषणे मुख्यमंत्री व सरकारवर टीका करणारी होती. नव्या शपथविधीने त्याला चपराक मिळाली आहे. महाविकास आघाडीत आलबेल नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो, त्याची प्रचिती आली. आमचे एखादे मंत्रिपद कमी झाले तरी देशाचे नेतृत्व मजबूत करणे अधिक महत्त्व आहे. उरलेली मंत्रिपदे लवकरच दिली जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
लोकसभेत ४५ जागा जिंकण्यावर भर
राज्यातील विधानसभा व लोकसभा निवडणूक शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्रपणे लढतील, तिकीट वाटपावरुवन कोणताही वाद होणार नाही. लोकसभेत राज्यातील ४५ जागांवर विजयी होण्यासाठी तिन्ही नेते कार्यरत राहतील. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, घड्याळ चिन्ह कुणाचे, याचा निर्णय अजित पवार व त्यांचे सहकारी घेतील. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील या शपथविधीला हजर होते, त्यामुळे हा राष्ट्रवादीचा सर्वसमावेशक निर्णय असावा असे सामंत म्हणाले.