Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. तर शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यानंतर शिंदे गटाच्या युवासेनेने बॅनरबाजी करत, ठाकरे गटाला डिवचले आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीकाही करताना दिसत आहे. यातच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कॅव्हेट दाखल केला आहे. यातच ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. शिंदे गटाच्या युवासेनेने बॅनर लावले असून, काँग्रेस– राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला, असे म्हटले आहे.
एकनाथाने काँग्रेस, NCPच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण सोडवला
अंबरनाथमध्ये युवासेनेकडून लावलेल्या या बॅनर्समुळे शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंबरनाथच्या वडवली परिसरातील रोटरी क्लब चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना दाखवण्यात आले आहे. तर प्रभू श्रीराम एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देत आहेत, तसेच यशस्वी भवः असा आशिर्वाद देत असल्याचे दाखवलण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हेही आशिर्वाद देताना दाखवण्यात आले आहेत. तसेच, “बघितलस आनंदा... आपल्या एकनाथाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण सोडवला”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असल्याचे दाखवले आहे.
दरम्यान, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"