बीड – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आहे. सरकारने आरक्षणासाठी पाऊले न उचलल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांचीही काही तरूणांनी तोडफोड केली. एकीकडे काही गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली तर आता दुसरीकडे राजकीय पक्षातील मराठा नेत्यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा पहिला राजीनामा पडला आहे. मराठा आरक्षणावर २४ तारखेपर्यंत निर्णय झाला नाही यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे बीडचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकतात असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. आमचा देखील विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे असं त्यांनी म्हटलं.
परंतु मराठा आरक्षणाचा निर्णय वेळेत झाला नाही, हा निर्णय घेण्यास विरोध कोण करत आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी समोर आणावे. जनता त्याला माफ करणार नाही. मराठा समाजाची वेदना लक्षात घेऊन सरकारने तात्काळ आरक्षण जाहीर करावे अशी मागणी राजीनामा दिलेले उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी शासनाला केली आहे. तळेकर यांच्यासोबत पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिले असून आरक्षण आमच्या हक्काचे अशाप्रकारे शिवसेना कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली.
राजीनामा पत्रात काय म्हटलंय?
मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे मी माझा उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा कुणबी आरक्षणाचा जीआर काढावा. महाराष्ट्रातील मराठा समाज अतिशय बिकट आणि गरीब परिस्थितीतून वावरत आहे. मराठा समाजातील मुले आरक्षण न दिल्यामुळे आत्महत्या करत आहेत. जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी मागणी परमेश्वर तळेकर यांनी केली आहे.