ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 19- जैतापूर येथील प्रकल्पाचे काम सन 2018 मध्ये पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. भाजप बरोबर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवित लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. त्यामुळे या प्रकल्पावरुन शिवसेनेने जनतेची फसवणूक केली आहे.अशी टिका करतानाच शिवसेनेने या प्रकल्पाविषयी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असे प्रतिपादन काँग्रेस आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.
यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, शिवसेनेने जैतापुर तसेच तोंडवळी येथील सी- वर्ल्ड प्रकल्पाबाबत राजकारण करीत जनतेेकडे मते मागितली होती. तसेच या मुद्यावरून त्यांचे खासदार तसेच आमदार निवडून आले आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पाविषयी शिवसेनेवाले आता काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यानी जनतेची फसवणूकच केल्याचे स्पष्ट होते.
अशा लोकांवर जनतेने विश्वास ठेवायचा का? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पर्यटनमंत्र्यानी सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत आमदार वैभव नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
वैभव नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत या प्रकल्पाचे राजकारण करीत नारायण राणे यांच्या विरोधात मते मागितली होती. त्यामुळे आता त्यांनी त्याबाबत जनतेला सपष्टीकरण द्यावे. सिवर्ल्ड प्रकल्पाविरोधात तेथील देवस्थानने कौल दिला आहे. हे वैभव नाईक का लपवत आहेत? जर मालवण येथे सिवर्ल्ड प्रकल्प होत नसेल तर आम्ही तो देवगड येथे घेवू. त्यासाठी लागणारी जागा तेथे उपलब्ध आहे.
माजी आमदार विजय सावंत यांनी साखर कारखान्यावरुन राणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. साखर कारखान्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी त्यांच्या अर्जा अगोदर आम्ही अर्ज केलेला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सावंत यांनी 10 हजार तरुणांकडून नोकरी देतो असे सांगून अर्ज भरुन घेतले आहेत. त्या सर्वाना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात.असे झाले तर जनतेच्या हितासाठी आम्ही आमचा अर्ज मागे घ्यायला तयार आहोत. कारखान्याला आमचा विरोध नाही. त्यांना प्रामाणिकपणे कारखाना सूरु करायचा आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
जिल्हा बँकेने कर्ज कोणाला द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते राणेना विचारुन् कोणाला कर्ज देत नाहीत. कर्ज हवे असेल तर त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. नियमानुसार कर्ज दिले जाईल. त्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नसेल.(प्रतिनिधी)
त्यांचे पक्षप्रमुख इडीच्या भितीमुळे गेले होते का?
इडीच्या चौकशीमुळे राणे भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत.अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्याविषयी बोलताना नीतेश राणे म्हणाले की, अलीकडे शिवसेना पक्षप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. ते सुध्दा ईडीच्या भीतिमुळेच त्यांना भेटले होते का?असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी फक्त टिका करीत बसण्यापेक्षा झेंड्याच्या पलीकडे जावून कार्यकर्ते निर्माण करावेत. त्यांच्या हयातीतच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय व्हावा अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.असेही राणे यावेळी म्हणाले.
पक्ष आर्थिक अडचणीत कसा?
काँग्रेस पक्ष आर्थिक अडचणीत असून आमदारांचे वेतन पक्षासाठी घेण्याचा प्रस्ताव अजुन माझ्याकडे आलेला नाही. या प्रस्तावाला माझा विरोध असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.असे असताना पक्ष आर्थिक अडचणीत कसा असेल. ज्या पक्षाची आपण पदे उपभोगतो त्या पक्षासाठी आपण वेळप्रसंगी आपल्या खिशात हात घालणार नसू तर काय उपयोग? याबाबतची आमची मते वरिष्ठाना कळविण्यात येतील. विजय सावंत यांच्यासारख्या व्यक्ति पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात निवडणूक लढवित असतानाही त्यांच्या विरोधात पक्ष काहीच कारवाई करीत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पक्ष प्रवेशाच्या अफवाच !
आम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत असल्याच्या फक्त अफवाच पसरविल्या जात आहेत. ओरोस येथे बुधवारी झालेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक ही नियोजित कार्यक्रमांसाठी होती. नारायण राणे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर दिल्याबद्दल मला काहीही कल्पना नाही असे नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.