"'थोरातांची कमळा' चित्रपट गाजला, आता 'विखे-पाटलांची कमळा' आला; पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:09 AM2020-06-22T08:09:24+5:302020-06-22T08:11:19+5:30

शिवसेनेकडून विरोधकांचा समाचार; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर सडकून टीका

shiv sena slams bjp and radhakrishna vikhe patils attack on congress leader balasaheb thorat | "'थोरातांची कमळा' चित्रपट गाजला, आता 'विखे-पाटलांची कमळा' आला; पण..."

"'थोरातांची कमळा' चित्रपट गाजला, आता 'विखे-पाटलांची कमळा' आला; पण..."

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जोरदार समाचारसत्तेसाठी केलेल्या पक्षांतरांची करून दिली आठवणराज्यातील विरोधी पक्षात बाटगे घुसलेत; भाजपावर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात 'बाटगे' घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणं कठीण आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनामधून भाजपाचा समाचार घेतला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लाचार म्हणणाऱ्या भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना सामनामधून लक्ष्य करण्यात आलं आहे. फार पूर्वी 'थोरातांची कमळा' हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे-पाटलांची कमळा' असा एक चित्रपट आला व पडला, अशा शब्दांत विखे- पाटलांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 'काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात,' अशी टीका विखेंवर करण्यात आली आहे.

विखेंनी सत्तेसाठी, पदांसाठी केलेली पक्षांतरं याचाही उल्लेख सामनानं अग्रलेखात केला आहे. 'विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव व साम्राज्य ही काँग्रेसचीच दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात व केंद्रात मंत्रिपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व 2019च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये,' अशा शब्दांत विखे-पाटलांवर शरसंधान साधण्यात आलं आहे. 

सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या, निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे. 'सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात 'बाटगे' घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते,' असा टोला लगावण्यात आला आहे. 

'पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. विखे-पाटील अधूनमधून बोलतात, ''आम्ही भाजपमध्ये खूश आहोत.'' जे विखेंना ओळखतात ते यावर विश्वास ठेवणार नाहीत. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील. महाराष्ट्राचे 'ठाकरे सरकार' स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी 'थोरातांची कमळा' हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे-पाटलांची कमळा' असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची 'टूर ऍण्ड ट्रॅव्हल' कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय!,' अशा शब्दांत शिवसेनेनं विखे-पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

Web Title: shiv sena slams bjp and radhakrishna vikhe patils attack on congress leader balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.