Maharashtra Politics: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना भाजपवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून जयप्रकाश नारायण यांचे स्मरण करत भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांची विचारधारा व विचारवारसा यावरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त झाले अमित शहा यांच्या एका वक्तव्याचे. ‘जेपीं’च्या १२० व्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमेचे अनावरण केले. त्या सोहळ्यात गृहमंत्र्यांनी नितीश कुमार, लालू यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायांनी सत्तेसाठी आपल्या विचारांचे बलिदान दिले आणि आता ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.’ अमित शहा यांचा हा हल्ला सरळ सरळ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर होता. नितीश कुमारांनीही मग त्यावर सांगितले की, ‘अमित शहांचे विधान दखलपात्र नाही. ज्यांचे राजकीय आयुष्य वीस वर्षांचेही नाही त्यांना जयप्रकाश काय समजणार?’, असे म्हटले होते. याच अनुषंगाने शिवसेनेनेही भाजपवर हल्लाबोल केला आहे.
देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे
जयप्रकाश नारायण हे देशांतर्गत हुकूमशाहीविरुद्ध लढले. लोकशाही रक्षणासाठी त्यांनी लढा दिला. आज देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाहीच दिसत आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या लढ्याची आठवण तुम्ही करून देता, पण सध्याचे भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना कोणी तिलांजली दिली व कोण कोणाच्या मांडीवर बसले हा वाद निरर्थक आहे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले?
अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले? असा प्रश्न नितीश कुमारांनी विचारला. जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, पण देशातील विरोधकांना तरी जयप्रकाश लवकरात लवकर कळले तर बरे होईल, असा टोला लगावताना, आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता. जयप्रकाश नारायण हे मूळचे काँग्रेसीच होते. पण जयप्रकाश यांनी काँग्रेस पक्षातही कधी वैचारिक तडजोड केली नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, आज क्रांतीची भाषा करणाऱ्या राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले जात आहे. त्याच हुकूमशाही हातांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे अनावरण करावे ही लोकशाही व स्वातंत्र्याची शोकांतिकाच म्हणायला हवी. शालेय पुस्तकांत अनेक धडे सध्या घुसवले जातात. ‘जयप्रकाश नारायण यांचा हुकूमशाहीविरुद्ध लढा’ हा धडाही नव्या पिढीसाठी शालेय पुस्तकांत घाला. अमित शहा यांनी त्या कामी पुढाकार घ्यावा ही विनंती!, अशी खोचक मागणी शिवसेनेने केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"