मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही!, या शब्दांत शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
अद्याप सरकारचा पाळणा हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशीच या लोकांची अवस्था झाली आहे. शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ‘ईडी’च्या भीतीनेच लोक सैरावैरा पळू लागले व त्याच भयग्रस्त अवस्थेत ते शिंदे यांच्या गलबतात चढले. ते गलबतही आता भरकटले आहे. त्यांच्या विचारांना दिशा नाही व कृतीला कर्तृत्वाची जोड नाही. शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आपण हाणून पाडल्याची भाषा शिंदे यांनी सिल्लोडच्या मेळाव्यात केली. सिल्लोडची भूमी त्यांनी क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी निवडली, पण सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे, असा खोचक टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे
मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. अर्थात महाराष्ट्राला कळत असले तरी भाजपास वळायला वेळ लागेल हे मात्र खरेच. अशा या मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्र दौरा काढला व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भागात ते तुताऱ्या फुंकून आले. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत. ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे, या शब्दांत शिवसेनेने हल्लाबोल केला आहे.