गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. परंतु पुन्हा लॉकडाऊन लावावा का यात मतमतांतरं दिसून आली. विरोधी पक्षानंही लॉकडाऊनला विरोध केला होता. "टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारे नाही," असं शिवसेनेनं म्हटलं आहे."राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, असे सरसकट सगळय़ांचेच म्हणणे आहे व ते योग्यच आहे. महाराष्ट्रात सध्या रोज पंचवीस हजारांवर कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत पाच-सहा हजार रोजचा आकडा आहे. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाटा नाहीत. हे चित्र तरी राज्याला परवडणारे आहे काय? राज्यात कोरोनाच्या संक्रमणास लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉक डाऊनचे संकेत दिले आहेत. त्या लॉक डाऊनवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत," असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेसेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर भाष्य केलं आहे.काय म्हटलंय अग्रलेखात ?‘महाराष्ट्रात लॉक डाऊन कराल तर याद राखा. रस्त्यांवर उतरू,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लॉक डाऊन नकोच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल सांगत आहेत. लॉक डाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्याची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉक डाऊन गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्यच आहे.लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे. ‘गेला गेला कोरोना गेला आहे’ असे मानून लोकांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली. त्यात मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे नाही. ग्रामीण भागात तर जे लग्न समारंभ साजरे केले गेले त्यात हजारोंची गर्दी करून लोकांनी कोरोनासाठी पुन्हा पायघडय़ाच घातल्या. महाराष्ट्रात लॉकडाऊन नसला तरी रात्रीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्याच लागतील. उत्तर प्रदेशात मथुरेत-वृंदावनात लाखो लोकांनी होळीचा सण साजरा केला. त्यांना कोरोना होत नाही. मग आम्हालाच कसा होईल? हे तर्कट चुकीचे आहे. प. बंगालातील प्रचारसभेत हजारोंची गर्दी होतेच. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘विना मास्क’ रोड शोचे शक्तिप्रदर्शन होत आहे. मग महाराष्ट्रातच लॉक डाऊनचा विचार का करता? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील रोज वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या आकडय़ात आहेत. एपंदरीत देशातच कोरोनाची स्थिती वाईटाहून अधिक वाईट झाली आहे. याक्षणी देशात केविड रुग्णांची संख्या दीड कोटीच्या आकडय़ात पोहोचली आहे.राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकटय़ा नागपुरात ५४ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही.
टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 8:30 AM
Coronavirus : राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नसला तरी रुग्णालये भरली,खाटा नाहीत हे चित्र परवडणारं आहे का? शिवसेनेचा सवाल
ठळक मुद्देलोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे : शिवसेना... तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्या लागतील : शिवसेना