मुंबई - एकमेकांवर टीका करत भाजप आणि शिवसनेने पाच वर्षे पूर्ण केली. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा सुद्धा एकत्र लढणार असल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगितले जात आहे. मात्र याच युतीधर्मामुळे वाशिममध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटणी यांना त्यांच्याच कारंजा मतदार संघात उमेदवारी मिळवणे अवघड झाले आहे. दोन मतदार संघात आधीच भाजपचे उमदेवार निश्चित आहे. तर तिसरा मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पाटणींंची डोकेदुखी वाढली आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम,कारंजा,रिसोड ही तीन मतदारसंघ आहेत. यातील वाशिम आणि रिसोड हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहे. तर राजेंद्र पाटणी हे आमदार असलेल्या कारंजा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यात, वाशीम मतदार संघातून भाजपचे लखन मलिक यांची उमेदवारी निश्चित आहे. रीसोडचा विचार केला तर दोन वेळा भाजपकडून आमदार राहिलेले विजय जाधव यांचे नाव पुढे येतो. त्यात उरलेला कारंजा मतदारसंघ युतीच्या नियमानुसार शिवसेनेकडे आहे. त्यामुळे राजेंद्र पाटणी यांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
खासदार भावना गवळी यांनी नुकतेच माजी आमदार प्रकाश डहाके यांचा विधानसभेत उमेदवारी देण्याच्या आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश करून घेतला. त्यामुळे शिवसेना सुद्धा कारंजा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पाटणी यांची अडचण वाढली आहे. तर पाटणी यांना भाजपकडून विधानपरिषदेचे आश्वासन देऊन यावेळी माघार घेण्याची खेळी पक्षाकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.