सातारा : राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि 40 हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावणारे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेही नाव घेतले जाते. गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली. त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जे काही बोलतात ते कधीच खरे ठरत नाही, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली.
आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याच घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा, राजकारण सोडुन घरी बसेन. त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले. तसेच, राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील, असे भाकीत शरद पवार यांनी केले होते. यावर बोलताना शरद पवार यांचे भाकीत सत्य नसून ते जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही, हे अनेकदा अनुभवायला आले आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी 15 लोकांची शिवसेना की 41 लोकांची ठरवावे आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेण्याचे काम करत आहे. या भावनेतून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जाण्याचे ठरवले आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? यावर ते म्हणाले की आम्ही जिथे राहत होतो, तिथे रेंज नसल्याने आमचा फोन लागत नसल्याचे सांगत शंभूराज देसाई यांनी बोलण्याचे टाळले. तर आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघातील जनतेच्या मदतीसाठी दाखल झालो असून आता आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या चाळीसही आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात स्वागत होत आहेत. त्यामुळे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत हे स्पष्ट होत आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
याचबरोबर, आमची काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नाही बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसने आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्ही शिंदे साहेबांच्या खांद्यावर मान ठेवली आहे. ते निर्णय घेतील तो मान्य असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. तसेच, आपल्या मतदारसंघात पिकांची काय परिस्थिती आहे याचे अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले आहेत. यामुळे मतदार संघात फिरून पाहणी करणार आहे. तसेच, जिल्हा पालक सचिव येऊन पिकांची पाहणी करणार असल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.