ठाणे - राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी शिंदेबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून हा पलटवार करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल
नरेश म्हस्के म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा त्यांनी दिला.
तसेच आदित्य ठाकरे यांनाही संजय राऊतांसारखा मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट घडली नसली तरी ती झाल्याचा भास होतो. त्यांना मानसोपचाराची गरज आहे. अचानक हा आरोप कसा आला? उद्धव ठाकरेसुद्धा माझे मुख्यमंत्रिपद वाचवा म्हणून एकनाथ शिंदेंकडे गयावया करत होते असं आम्ही म्हटलं तर तुम्ही खरे मानणार का? फोनवर सूरत, गुवाहाटीला एकनाथ शिंदे होते तेव्हा उद्धव ठाकरे शिंदेंना सातत्याने फोन करून रडत होते. तू परत ये, माझे मुख्यमंत्रिपद वाचवा असं म्हणत होते, ही बातमी माध्यमांनी छापावी असा खोचक टोला नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, दिल्लीत पप्पू तसा महाराष्ट्रातही नवीन पप्पू निर्माण झालेला आहे. उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले. संजय राऊत हे दुतोंडी गांडूळ आहे. एक तोंड मातोश्रीकडे तर दुसरे तोंड सिल्व्हर ओककडे आहे. बोलताना भान ठेवा अन्यथा तुमच्याहीविरुद्ध त्या पातळीवर जाऊन बोलायला आम्हाला वेळ लागणार नाही असा इशाराही नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला आहे.