Maharashtra Politics: राज्यात एकीकडे विविध स्तरांवरील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नव्या शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधताना, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? असा खरमरीत सवाल केला आहे.
शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीला कात्री लावल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटींचे वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय, असा दावाही यावेळी करण्यात आला. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले?
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? तेव्हा खोटे खोटे आश्वासन दिले, अशी टीका करताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा पगारासाठी ३६० कोटी रूपये दिले जातील, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या पगारासाठी फक्त १०० कोटी रुपये अनुदान दिले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगाराचे जे हप्ते आहेत, उदा; एलआयसी, पीएफ, घर बांधनी कर्ज दिल्या जाणाऱ्या पगारातून सध्या होत नाही. फक्त निव्वळ वेतन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अशा वातावरणात एखाद्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले, एखादी दुर्घटना घडली तर त्याला यामधून कोणतीही अनुदान मिळणार नाही, तो या मोबदल्यापासून वंचित राहणार आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे हप्ते फेडता येत नाहीत. गेल्या दोन महिन्यापासून फक्त कर्मचाऱ्यांना नेट पगार मिळत असल्यामुळे घराचे कर्ज फेडू शकला नाही, अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांच घर कधीही जप्त होऊ शकते, अशी भीती मालोकार यांनी यावेळी व्यक्त केली.